जेएमसीटी स्कुलमध्ये शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थ्याला काठीने मारहाण;
जेएमसीटी स्कुलमध्ये शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थ्याला काठीने मारहाण;
img
दैनिक भ्रमर



नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शाळेत आयोजित ॲन्युअल स्पोर्ट्स डे कार्यक्रमात खाली बसण्यास उशीर झाला म्हणून चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने मारहाण करून दुखापत केली, तसेच शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाळेतील शिक्षक व पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी परवेज मंजूर शेख (रा. चौक मंडई, जुने नाशिक) यांचा मुलगा मोहंमद सुहान परवेज शेख (वय 13) हा वडाळा रोडवरील जेएमसीटी स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे.

दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेच्या सुमारास या शाळेत ॲन्युअल स्पोर्ट्स डे साजरा करण्यात येत होता. त्यावेळी आरोपी फारुक तेथे आले व त्यांनी सर्व मुलांना खाली बसण्यास सांगितले; मात्र फिर्यादी यांचा मुलगा मोहंमद शेख याला खाली बसण्यास उशीर झाला.

याचा राग आल्याने फारुक यांनी या मुलास लाकडी काठीने मारहाण करून ओठांवर, उजव्या पायास व डाव्या खांद्यास त्याला दुखापत केली, तसेच जेएमसीटी स्कूलचे कॅम्पस पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी यांनी मोहंमद शेख या विद्यार्थ्यास शाळेतून काढून टाकण्याची व ब्लॅकलिस्टमध्ये नोंद करण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेएमसीटी स्कूलचे शिक्षक फारुक (पूर्ण नाव माहीत नाही) व पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group