आजकाल सोशल मीडियाचे जग असून सोशल मीडियाचे फायदे तितकेच तोटे देखील आहेत. तसेच सोशल मीडियावरून अनेक अनोळखी लोकं एकमेकांशी जोडले जात आहेत. मात्र यातूनच अनेक प्रकारच्या गंभीर गुन्हे घडत असल्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबईतील जोगेश्वरी भागात धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर भेटलेल्या मुलीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. तरुणाने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार केले. इन्स्टाग्रामवर ओळख झालेली मुलगी मृत तरुणाला कधीच भेटायला आली नाही. जरी ती त्याच्यासोबत बाहेर गेली नाही तरी, मुलीने गर्भवती असल्याचे सांगून मुलाला ब्लॅकमेल केले.

मुलीच्या सततच्या छळाला कंटाळून त्या तरुणाने अखेर आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
जीवन संपवलेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव सचिन मेघजी गाला आहे. तो मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी, त्याची इंस्टाग्रामवर मुस्कान नावाच्या मुलीशी भेट झाली. यानंतर दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. पुढे ही ओळख घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नव्हते. याशिवाय, दोघेही कधीही एकत्र फिरायला गेले नाहीत.
तरीही मुस्कान त्या तरुणाला गर्भवती असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत होती. गेल्या काही दिवसांपासून मुस्कान सचिनला मानसिक त्रास देत होती. या छळाला कंटाळून तरुणाने 26 फेब्रुवारी रोजी त्याच्या घरात स्वत:वरच चाकूने वार केले. या घटनेत सचिन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेमध्येच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी उपचार करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. 4 मार्चला सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.