ओडिशाच्या बालासोरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या विद्यार्थिनीने कॉलेजमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं. प्रोफेसरकडून शरीरसंबंधासाठी वारंवार होत असलेल्या जबरदस्तीला कंटाळून या विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले. ही संपूर्ण घटना कॉलेजच्या सीसीटीव्हीत कैद झाली. ही विद्यार्थिनी जळालेल्या अवस्थेत इतडे तिकडे पळत होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,कॉलेजचे विभागप्रमुख या विद्यार्थिनीला सतत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत होते आणि भविष्य खराब करण्याची धमकी देत होते. त्यांच्या या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून या विद्यार्थिनीने कॉलेजच्या कॅम्पसमध्ये स्वत:ला पेटवून घेतलं. पीडित विद्यार्थिनी ९४ टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी कॉलेजचे विभागप्रमुख समीर कुमार साहू यांना अटक केली. तर उच्च शिक्षण विभागाने आरोपी हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि कॉलेजमधील प्रोफेसरला निलंबित केले.
राज्य उच्च शिक्षण मंत्री सूर्यवंशी सूरज यांनी या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
विद्यार्थिनीने तिच्या विभागाचे एचओडी समीर कुमार साहू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले होते की, साहू बऱ्याच काळापासून तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होते. विद्यार्थिनीने अनेक वेळा महाविद्यालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. परंतू कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं.
या घटनेनंतर विद्यार्थिनी गंभीर भाजली. तिला वाचवण्यासाठी धावणारा दुसरा विद्यार्थीही गंभीररित्या भाजला. दोघांनाही प्रथम बालेश्वर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भूवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॉलेजमध्ये धाव घेत समीर कुमार साहूला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.