अहिल्यानगर : राज्यातील बालकामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच मागील दीड वर्षापासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहूखेल येथे काही अल्पवयीन बालकामगारांकडून घरातील कामे, शेतीचे तसेच गोठ्यातील कामे करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली होती . या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बीडमधील ९ अल्पवयीन मुली आणि ६ मुलांची सुटका केल्याची माहिती अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त व बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून केली होती.
यातील एका बालकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींवर झिरो एफआयआर दाखल करत संबंधित प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केलं आहे.
बालकांच्या तक्रारीनंतर पथकानं गावात टाकला छापा- याबाबतची मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालकांचे पालक हे कर्नाटक येथे काम करण्यासाठी गेले होते. आष्टी येथे आरोपींकडून घरचे काम करून घ्यायचे, त्यांचे गुर सांभाळण्याचं काम लावले होते.
यादरम्यान कामाचा कुठलाही मोबदला न देता उलट या बालकांना मारहाण केली जात होती. तसेच शिळे आणि सुके अन्न त्यांना खायला देत असल्याची तक्रार यावेळी बालकांनी केली. सततच्या मारहाणीला घाबरून यातील दोन बालके गावातून पळाले. रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशी पायी प्रवास केल्यानंतर एक अनोळखी व्यक्तीनं या दोन बालकांना पोलिस स्टेशनमध्ये नेले.
त्यानंतर पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दोन बालकांना बालगृहात पाठविण्यात आलं. यावेळी बाल समितीच्या सदस्यांनी या बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी आमच्यासारखे आणखीन १० ते १२ जण गहूखेल या गावात असल्याची माहिती दिली.
त्यानंतर अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त आणि बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं २० जून रोजी कारवाई करत १५ बालकांची सुटका केली.
मुलांना बालगृहात पाठविलं-दरम्यान, या घटनेत सुरुवातीला अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन बालकाच्या तक्रारीवरून झिरो एफआयआर दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून ९ आरोपींवर आंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सध्या, यातील सहा मुले बीडच्या बालगृहात तर ९ मुली आर्वी येथील मुलींच्या बालगृहात ठेवण्यात आलं आहे.