रोहित कुंडलवालचा आणखी एक प्रताप उघड; ४० लाखाचे मागितले ८० लाख दिले नाहीतर ...
रोहित कुंडलवालचा आणखी एक प्रताप उघड; ४० लाखाचे मागितले ८० लाख दिले नाहीतर ...
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 40 लाखांच्या कर्जापोटी मुद्दल व व्याज मिळून 80 लाख रुपयांची खंडणी मागून ती खंडणी न दिल्यास पिस्तूलचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कुंडलवाल पितापुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जगदीश भगतराम साधवानी (रा. शाहू पथ, महाराज रोड, नाशिकरोड) व त्यांचा मुलगा आकाश साधवानी यांनी आरोपी कैलास बाबूलाल कुंडलवाल, रोहित कुंडलवाल व निखिल कुंडलवाल (रा. उदय कॉलनी, पंचवटी) यांच्याकडून व्यवसायासाठी 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेवर साधवानी यांच्या मुलाकडून आरोपी कुंडलवाल पितापूत्रांनी विनापरवाना अवाजवी व्याजाची मागणी करुन आजपर्यंत सुमारे 80 लाख रुपये वसूल केले आहे.

तरी देखील कुंडलवाल पितापुत्रांनी 40 लाख रुपयांची मुद्दल, खंडणी व व्याज मिळून असे एकूण 80 लाख रुपयांची मागणी फिर्यादी साधवानी व त्यांच्या मुलाकडे केली. तसेच आरोपी कुंडलवाल यांनी आकाश साधवानी याला पैशांसाठी सतत फोन करून तु जर नाशिकमध्ये दिसला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी वारंवार देऊ लागले. या धमकीला घाबरून फिर्यादीचा मुलगा आकाश हा पुणे येथे निघून गेला. त्यानंतर हॉटेल फाईव्ह इलेमेंट येथे आरोपी रोहित कुंडलवाल याने त्याच्याकडील पिस्तूलचा धाक दाखवून फिर्यादी यांना तुम्ही जर व्याज व मुद्दल असे 80 लाख रुपये आम्हाला दिले नाही, तर तुमच्या दोन्ही मुलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

मुख्य आरोपी कैलास कुंडलवाल याने साधवानी यांच्या घरात बळजबरीने घुसून दरवाजाला लाथा मारुन घराचे नुकसान केले व त्यांच्यावर पिस्तुल रोखून तुम्ही आम्हाला आज 3 ते 4 लाख रुपये देणार होते. ते का दिले नाही, आमचे मोठमोठ्या राजकीय लोकांशी संबंध आहेत. तुम्हाला कधीही गायब करू शकतो, असे म्हणून त्यांना दमबाजी केली. तसेच घरातील महिलांकडे पाहून अश्लिल इशारे करून महिलांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी रोहित व कैलास कुंडलवाल यांनी फिर्यादीच्या घरातील कपाट बळजबरीने उघडून त्यातील सामानाची उचकापाचक केली.

त्यानंतर कपाटाच्या ड्रॉवरमध्ये असलेली 1 लाख रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. तसेच फिर्यादीच्या मुलाच्या कॉलेजरोड-वरील तितली बुटीक या दुकानात जाऊन रोहित कुंडलवाल याने आकाश याला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तूल रोखून 80 लाख रुपये दिले नाही, तर तुला जिवे ठार मारू, तसेच तुझ्या भावाला गायब करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कुंडलवाल पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नाईकवाडे करीत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group