राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून दार दिवशी महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना उघडकी येत आहे. पुण्यामधील स्वारगेट येथे बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना ताजी असतानाच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
नराधम आरोपीनं पीडित मुलीचं कॉम्प्युटर क्लासेससमोरून अपहरण केलं होतं. मी तुझ्या मामाला ओळखतो, तुझ्या मामाने मला पाठवलं आहे, अशी बतावणी करत आरोपीनं रिक्षातून पीडितेचं अपहरण केलं. यानंतर आरोपी पीडितेला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेला चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. शरीर संबंध ठेवू दे, नाहीतर गळा चिरून विहिरीत टाकेन, अशी धमकी आरोपीनं पीडितेला दिली. यानंतर आरोपीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. हे प्रकरण वाशीम जिल्ह्यातील सवड परिसरात घडलं आहे.
शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 8 पोलीस पथकं तैनात केली होती. याबाबतचे काही CCTV फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली होती. तुकाराम कांबळे असं नराधम आरोपीचं नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना झाली आहेत.
वाशिमच्या रिसोड शहरातील सिव्हिल लाईन भागात असलेल्या एका कॉम्प्युटर सेंटर समोर एक 16 वर्षीय शाळकरी मुलगी उभी असताना आरोपी तुकाराम सखाराम कांबळे तिथे आला. त्याने पीडितेला नात्यातील ओळख दाखवत अगोदर एका ज्यूस सेंटरवर नेलं. मुलगी आणि आरोपी रस्त्यावरून जातानाचे CCTV फुटेज समोर आले आहेत. त्यानंतर आरोपीने मुलीला रिक्षामध्ये बसवून सवड परिसरातील निर्जन स्थळी नेलं. तिथे गेल्यावर आरोपीनं मुलीला चाकूचा धाक दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. मला शरीर संबंध ठेवू देत, नाहीतर गळा चिरून विहिरीत टाकेन, अशी धमकी आरोपीनं पीडितेला दिल्याची माहिती आहे.
या धमकीनंतर घाबरलेल्या पीडितेवर आरोपीने लैंगिक अत्यचार केला आणि तिथून पसार झाला. अत्याचारानंतर मुलीने तिच्या मामाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही असा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. नराधमाचा शोध घेतला जातोय.