शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या मुलीचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कॅनडातील ओटावा येथे समुद्र किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह आढळून आला. कामासाठी घराबाहेर पडलेली ही तरुणी परत आलीच नाही. त्यामुळे तिचा शोध घेतला असता समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार , वंशिका सैनी असं या तरुणीचे नाव असून ती पंजाबच्या डेराबासी येथील रहिवासी होती. वंशिकाच्या कुटुंबियांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
डेराबासी येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २१ वर्षांची वंशिका सैनी ही तरुणी उच्च शिक्षणासाठी अडीच वर्षांपूर्वी कॅनडाला गेली होती. तिने दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १८ एप्रिल रोजी तिने अंतिम परीक्षा दिली.
यानंतर ती एका कंपनीत काम करत होती. ती आप नेते दविंदर सैनी यांची मुलगी होती. दिवंदर सैनी हे आपचे आमदार कुलजीत सिंग रंधावा यांचे जवळचे मित्र आणि सहकारी आहेत. वंशिकाच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, ती २२ एप्रिल रोजी कामासाठी घराबाहेर पडली होती. पण ती परत आलीच नाही. २५ तारखेला तिची आयईएलटीएस परीक्षा होती. परीक्षेला ती गेली नाही.
त्यामुळे तिच्या मैत्रिणीने तिला वारंवार फोन केले पण तिचा फोन बंद होता. परीक्षा दिल्यानंतर, जेव्हा तिच्या मैत्रिणी वंशिकाच्या घरी आल्या तेव्हा त्यांना कळाले की, वंशिका २२ तारखेला कामावर गेली होती पण परत आलीच नाही.
वंशिकाच्या मैत्रिणींनी तिच्या भारतात राहणाऱ्या कुटुंबाला आणि तिथे राहणाऱ्या इतर मित्रांना कळवून तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिच्या मित्रांनी आणि इतर ओळखीच्या लोकांनी स्थानिक खासदाराशीही संपर्क साधला. वंशिकाचा विविध ठिकाणी शोध घेण्यात आला.अखेर वंशिकाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळला.
वंशिकाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी २२ तारखेला त्यांच्या मुलीशी फोनवर बोलणे केले होते. परंतु तीन दिवसांपासून काहीच बोलणे झाले नाही.' त्यांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.