लोणावळ्याजवळील मंकीहिल लोहमार्गावरील ठाकूरवाडी येथे रेल्वे रुळाजवळ गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मंकीहिल पॉईंटजवळ रेल्वेतून एका प्रवाशाला गुलाबी सुटकेस दिसली. त्याने तात्काळ याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
रेल्वे पोलिसांनी याबाबत तात्काळ लोणावळा पोलिसांना सांगितले. लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलाय.
लोणावळा पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने हत्या की आत्महत्या, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सुटकेस आणि परिसरातील इतर पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत.
लोणावळा रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचीही छाननी सुरू केली आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण, शोधण्यात येत आहे. लोणावळा अन् परिसरात लाल सुटकेसची जोरदार चर्चा सुरू आहे.