
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अवघ्या १४ वर्षीय बालिकेस विश्वासात घेऊन पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भावेश ऊर्फ उदयलाल नानालाल तेली (वय २३, मूळ रा. मालपुरा, जि. भिलवाडा, राजस्थान, हल्ली मु. शिवम् आईस्क्रीम दुकानावर, पिंपळगाव बसवंत) या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती मलकलपट्टे-रेड्डी यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी माहिती अशी, की सन २०१६ मध्ये अंबड ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनारायण रो-हाऊस, अंबड येथे राहणार्या पालकांच्या अल्पवयीन मुलीस गोड बोलून तिचे अपहरण करून पिंपळगाव बसवंत येथे आरोपी भावेश याने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३६६, ३५४ (ड), ३७६ (२), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ६ व १२ याअन्वये सप्टेंबर २०१६ मध्ये गुन्हा दाखल होता.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपनिरीक्षक सी. के. देवरे यांनी पुढील तपास करून खटला कोर्टात पाठविला होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ७ येथील न्या. श्रीमती मलकलपट्टे-रेड्डी यांच्या कोर्टात चालले.
त्यांनी पुढे आलेला तपास आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपीस भा. दं. वि. कलम ३७६ (३) अन्वये दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार आजगे कोर्ट अंमलदार, स. पो. उ. नि. दिनकर खैरनार आदींनी सहकार्य केले.
आरोपीस शिक्षा लागण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ-२ च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तपासी पथकाचे अभिनंदन केले आहे.