एखाद्याचा अपमान करणं जिवावरही बेतू शकतो, याचा प्रत्यय लातूरच्या रेणापुरात आला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एक अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे.
फक्त ‘ए चोरा’ अशी हाक मारल्याच्या रागातून एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आला आणि तिच्या अपंग पतीला थेट विहिरीत फेकून देण्यात आलं. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आरोपी गावातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
'ए चोरा' अशी कायम मस्तीत हाक मारणा-यांचा थेट खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणापूर तालुक्यातील गरसुळीमधील कातळे दाम्पत्याकडे 7 एकर जमीन असून त्यांना एकच मुलगा आहे. तो हैदराबादला नोकरी करतो. कातळे दाम्पत्य गरसुळी शिवारातील आखाड्यावर राहत होतं. मध्यरात्री आरोपी पंडित रावणकुळे दारुच्या नशेत आखाड्यावर गेला. पत्र्याच्या शेडमध्ये कातळे दाम्पत्य बसलेलं होतं. रावणकुळे यानं शेजारीच चुलीजवळ पडलेला कुकर पुष्पलता काजळे यांच्या कानावर मारला. यात त्यांचा कान तुटला आणि त्या स्क्तबंबाळ झाल्या. त्यानंतर त्यानं दगड उचलून त्यांच्या डोक्यात घालून त्यांना ठार केलं. दिव्यांग रावसाहेब कातळे यांनी ओरडाओरड केल्यानंतर आरोपीनं त्यांना उचलून विहिरीत फेकून दिलं.

दाम्पत्याचा खून केल्यानंतर संशयित रावणकुळे यानं पळून जाताना पुष्पलता यांच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडून नेलं होतं. तपासात मृत महिलेचं मंगळसूत्र चोरीला गेल्याचं नातेवाईकांना लक्षात आल्यानं त्यानं त्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी सर्वप्रथम संशयित म्हणून पंडित रावणकुळे याला ताब्यात घेतलं.
त्यानंतर पोलिसांनी हिसका दाखवताच संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली. या क्रूर घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे या दुहेरी खुनाची घटना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं.
यावेळी गावातील नागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती. या गर्दीत हा आरोपी रावणकुळे हा देखील तो दुहेरी हत्याकांड पाहण्यासाठी उभा होता अशी माहिती आहे.