
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पत्नीसोबत राहण्यास नकार दिल्याच्या रागातून सासू-सासर्यासह शालकांनी जावयासह त्याच्या आईला व बहिणीला मारहाण केल्याची घटना आडगाव शिवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ईश्वर भाऊराव जाधव (रा. दत्तनगर, आडगाव, नाशिक) हे दि. 18 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी जाधव यांचे आरोपी सासरे रमेश चतरू राठोड, सासू निर्मला रमेश राठोड, मोठा शालक प्रफुल्ल राठोड व लहान साला जयदीप राठोड (सर्व रा. भूपेशनगर, शिरपूर, जि. धुळे) हे त्यांच्या घरी आले.
त्यांनी परवानगीशिवाय फिर्यादीच्या घरात घुसून जावयाला मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीची आई व बहीण घरी आले असता सासरच्या मंडळींबरोबर चर्चा झाली. त्यानंतर फिर्यादी जाधव यांनी पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने सासरच्या लोकांनी पुन्हा फिर्यादी जाधव यांच्यासह त्यांच्या आईला व बहिणीला मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच “तुमच्या पूर्ण परिवाराला कौटुंबिक हिंसाचाराच्या खोट्या केसमध्ये टाकतो,” अशी धमकी दिली.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करीत आहेत.