धक्कादायक :  वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती;  सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं.....
धक्कादायक : वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं.....
img
Dipali Ghadwaje
पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू आणि दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यात आणखी एक अशीच घटना समोर आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सासरच्या अतोनात छळाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत तिचा जीव वाचला असून, तिने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेतील पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे अजय पवार यांच्याशी २२ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांतच पती अजय पवारने घरगुती कारणावरून आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासूनेही पीडितेला, “तू माहेरावरून काय आणले आहेस? तुझ्या आई-बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही,” असे म्हणून हिणवले.


पती अजय पवार हा देखील पीडितेला, “मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे, मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग तुझ्या बापाला,” असे म्हणू लागला. पीडितेने गाडी घेऊन देण्यास नकार दिल्यानंतर पतीने आपला गळा दाबून मारहाण केली. दीर मनोज पवार याने देखील आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

२१ मे रोजी पीडितेच्या सासूने पुन्हा एकदा तिला त्रास दिला. “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन,” अशी धमकी सासूने तिला दिली. “तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही, तू घरात आल्यापासून शांतता नाही,” असे म्हणून तिला हिणवले. हा सर्व त्रास सहन न झाल्याने या तरुणीने रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत या पीडितेचा जीव वाचला.

या घटनेनंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात पीडितेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  

इतर बातम्या
Join Whatsapp Group