शाळेतील मित्र , प्रेमविवाह अन् गळफास...! नाशिकमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ; नेमकं प्रकरण काय? वाचा
शाळेतील मित्र , प्रेमविवाह अन् गळफास...! नाशिकमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ; नेमकं प्रकरण काय? वाचा
img
Dipali Ghadwaje
वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच नाशिकमध्ये अशीच घटना घडली आहे. ३३ वर्षीय भक्ती अथर्व गुजराथी या विवाहितेने पती आणि सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवले. भक्तीनेही घरात गळफास घेतला.


या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या सिरीन मेडोज या उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अथर्व गुजराथी, मनीलाल गुजराथी, मधुरा गुजराथी या तिघांना अटक केली आहे.

मयत भक्ती आणि अथर्व हे लहानपणापासून ओळखत होते. दोघेही येवला शहरात मोठे झाले. भक्ती आणि अथर्व यांची घरे देखील जवळजवळ होती. ते दोघेही शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. ते चांगले मित्र बनले आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी २०१७ साली लग्न केलं. पण, त्यांचा हा प्रेमविवाह अथर्वच्या आईवडिलांना खटकला होता. त्यामुळे सुनेसोबत त्यांचेही पटत नव्हते आणि सतत वाद होत राहायचे, असे तपासातून समोर आले.

अथर्व हा व्यवसायानिमित्ताने बाहेरील राज्यात व देशांत दौऱ्यावर गेल्यानंतर तेथे 'रंगेल'चाळे करायचा. अथर्व गुजराथी याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याने बँकॉकमधील पटायामध्ये संबंध ठेवण्याच्या 'कृत्या'बाबत जेव्हा भक्तीला समजले, तेव्हा तिला धक्काच बसला. त्यानंतर त्या दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. अथर्व हा तिला पर स्त्रियांसोबत घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे काढून पाठवत मानसिक त्रास देत होता. ते फोटो काढून पत्नीला पाठवत होता, अशी माहितीही समोर आली आहे.

अथर्व आणि सासू सासऱ्यांबद्दल भक्तीने कुणाला सांगितले? 

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , भक्तीच्या मृत्यू प्रकरणाबद्दल माहिती देताना नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे म्हणाल्या, 'गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. भक्त्तीने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाबाबत तिचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणींला मेसेजेस केले आहेत. त्यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.' 

अथर्व आणि सासू-सासऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या छळामुळे भक्ती ही माहेरी म्हणजे येवल्याला निघून गेली होती. तिने सगळी आपबिती आई-वडील व भावाला सांगितली होती. भक्तीला लहान मुलगादेखील आहे. भक्ती येवल्याला आल्यानंतर पती अथर्व हा तिच्या घरी गेला. मी तिला त्रास देणार नाही, असे त्याने भक्तीच्या आई-वडिलांकडे सांगितले आणि तिला पुन्हा नाशिकला घेऊन गेला होता. पण, त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही आणि शेवटी भक्तीने आयुष्य संपवले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group