रिसॉर्ट वर गेलेल्या एका प्रेमीयुगुलांसोबत एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एक मुलगी आपल्या प्रियकरासह रिसॉर्टवर आली होती. त्याच्या बॅगेत गावठी कट्टा सापडला, पण चुकून ट्रिगर दाबल्यामुळे मुलीच्या मानेला गोळी लागली. या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पालघरमधील केळवेमध्ये येथे ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या केळवे या पर्यटनस्थळी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एक १७ वर्षी मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खाजगी रिसॉर्टवर गेली होती. रुममध्ये गेल्यानंतर तिचा प्रियकर हा वॉशरूममध्ये गेला होता. प्रियकर वॉशरुमला गेल्यानंतर या मुलीने त्याची बॅग तपासून पाहिली. मात्र बॅगेमध्ये तिला विनापरवाना असलेलाा गावठी कट्टा सापडला. गावठी कट्टा तिने बाहेर काढला आणि त्याची पाहणी करत होती. नेमकं त्यावेळी या मुलीकडून चुकून ट्रिगर दाबला गेला अन् गोळी सुटली. सुदैवाने ही गोळी मुलीच्या मानेला लागून गेली. या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली.
आवाज झाल्यामुळे प्रियकर बाहेर धावत आला, त्याने पाहिलं तर मुलीच्या हातात गावठी कट्टा आहे अन् मानेतून रक्ताच्या धारा वाहत आहे. त्याने तातडीने रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या मुलीला पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर तिला बोईसरच्या अधिकारी लाईफ लाईन्स या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात पालघर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.