नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून अनधिकृत पैशांचा व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती देऊन एका इसमाकडून ४८ लाखांची खंडणी उकळल्या-प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायबर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना व्हॉट्सअॅपद्वारे मोबाईलवर संपर्क साधला. मुंबई सीबीआय कार्यालयातून पोलीस अधिकारी मोहनदास असल्याचे भासवून त्यांनी फिर्यादीच्या आधारकार्डचा वापर करून विविध राज्यांत बँक खाते ओपन करण्यात आले असून, या खात्यांमधून एकूण साडेआठ कोटी रुपये अनधिकृत पैशांचा व्यवहार केल्याचा गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली.
तसेच सीबीआयचा लोगो असलेले एक पत्र पाठवून त्यामध्ये फिर्यादीचे नाव, आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून त्यांच्याविरुद्ध मनिलॉड्रींग, ड्रग्ज वाहतूक व हवाला या अपराधांचे गुन्हे दाखल असल्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारांनी बनावट चौकशीच्या नावाखाली त्यांच्या दोन्ही बँक खात्यातील सर्व रक्कम त्यांच्या विशिष्ट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरले नाही तर फिर्यादीसह त्याच्या सर्व कुटुंबियांना धोका असल्याची खोटी माहिती दिली. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यांच्या विशिष्ट बँक खात्यांमध्ये ४७ लाख ८७ हजार ५०० रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. सदर रकमेची फिर्यादीकडून खंडणी उकळली म्हणून संबंधित अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेधारक, तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा इसम यांच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत. हा प्रकार दि. १४ ते २० मे दरम्यानच्या काळात ऑनलाईन पद्धतीने घडला.