सध्या उन्हाळ्याचे सुट्ट्या असल्याकारणाने सर्वच जण सुट्ट्यांमध्ये आउट ऑफ स्टेशन फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पर्यटनस्थळांमध्ये गोवा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असून अनेक जा गोवा फिरायला जाण्याचा प्लॅनींगमध्ये असतील परंतु आता मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

खेडमधील भोस्ते घाटात भीषण अपघात झाला आहे. अवघड वळणावर ऑइल सदृश्य रासायनिक टँकर पलटी झाला असून संपूर्ण महामार्गावर ऑइलची गळती झाली आहे. त्यामुळे भोस्ते घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील सर्वात अवघड आणि अपघात प्राण क्षेत्र असलेल्या भोस्ते घाटातील अवघड वळणावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणारा टँकर संरक्षक भिंतीला धडकून पलटी झाला आहे. अपघातानंतर या टँकर मधील ऑइल सदृश्य रसायनाला गळती लागली आणि संपूर्ण महामार्गावर हे ऑईलयुक्त रसायन पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महामार्ग घसरडा झाला आहे.
मुंबईच्या दिशेने येणारी एक मार्गिका बंद
त्यामुळे या घाटातील मुंबईच्या दिशेने येणारी एक मार्गिका बंद करण्यात आले आहे. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि खेड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाला आहे. भोस्ते घाटातील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या घाटातील याच अवघड वळणावर आत्तापर्यंत शंभरहून अधिक भीषण अपघात झाले आहेत. घाटातील या अवघड वळण अपघात प्रवण क्षेत्र असून या ठिकाणाला प्रशासनाने ब्लॅक स्पॉट म्हणून म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.