नाशिक - भाजपाने आज राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली असली तरी नाशिक शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची घोषणा केलेली नाही. मालेगाव मध्ये मात्र विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणमध्ये मुदतवाढ मिळणार की नवीन चेहरा समोर येणार याकडे आता भाजप कार्यकर्त्यांची उत्सुकता लागली आहे.
भाजपने आज दुपारी राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या 86 नावांपैकी पन्नास नावांची घोषणा केली आहे. पक्षाने घोषित केलेल्या नावांमध्ये उत्तर महाराष्ट्रात नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. नाशिकच्या जिल्हाध्यक्षाचे नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याने याबाबत उत्सुकता लागली आहे. सध्या नाशिक दक्षिण मध्ये सुनिल बच्छाव, नाशिक उत्तर शंकर वाघ, मालेगाव मंडळात निलेश कचवे तर शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव कार्यरत आहेत. आज घोषित केलेल्या यादीमध्ये राज्यातील विद्यमान अध्यक्षांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे. यात मालेगावमध्ये निलेश कचवे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
तर शहराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रशांत जाधव, सुरेश पाटील, सुनील केदार, उत्तम उगले, अनिल भालेराव, पवन भगुरकर, नाना शिलेदार आदींची नावे चर्चेत आहेत. परंतु पक्षाने कोणत्याही एका नावावर सहमती केली नाही. त्यामुळे नवीन शहराध्यक्षाचे नाव घोषित होऊ शकलेले नाही.