राज्यावर अवकाळी पावसाचं  संकट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा
img
नंदिनी मोरे
राज्यातील  वातावरणात मोठे कमालीचे बदल झाले असून पुन्हा एकदा पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून,  27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.  अंदमानमध्ये आठ ते नऊ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे, तर केरळात देखील तीन ते चार दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार हे आताच सांगता येणार नाही, असं यावेळी सानप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होत आहे, येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवसांमध्ये  मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे, नागरिकांनी सतर्क राहावं अशी माहिती देखील यावेळी सानप यांनी दिली.

दुसरीकडे नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, इगतपुरी तालुक्यात सलग 6 व्या दिवशी अवकाळी पाऊस झाला आहे. विजेच्या कडकडाटासह व जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, तालुक्यातील 87 हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली आहे. उन्हाळी बाजरी व भाजीपाल्याची पिके जमीनदोस्त झाली आहे, मात्र दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group