चामरलेणीवर अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून सुखरूप उतरवले
चामरलेणीवर अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून सुखरूप उतरवले
img
चंद्रशेखर गोसावी

 
नाशिक :- चामरलेणीवर ट्रेकिंग करण्यासाठी गेलेल्या 2 महाविद्यालयीन युवकांना खाली कसे उतरावे हे समजत नव्हते त्यामुळे ते वरतीच अडकून पडले.

त्यापैकी एकाने पंचवटी अग्निशमन दलास आणि पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांसह म्हसरूळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी नितीन पारधे यांनी दोन्ही युवकांना चामरलेणीवरून रेस्क्यू करून सुखरूप खाली आणले. 
 
साहिल जयसिंग टिळे (वय २४, रा. उपनगर) ,ओम प्रकाश यादव (रा. उपनगर) हे दोन्ही युवक बिटको कॉलेजमध्ये एमएससी शिकत आहेत. हे दोघे आज सकाळी चामरलेणीवर ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. चामरलेणीवर ट्रेकिंग करत असताना टेकडीवर चुकून जाऊन अडकून गेले.

त्यांना खाली कसे उतरावे हेही समजेनासे झाले. यातील साहिल जयसिंग टिळे या युवकाने सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी मोबाईल फोन वरून  पंचवटी अग्निशमन केंद्राशी संपर्क साधत मी आणि माझा मित्र ओम प्रकाश यादव हा चामरलेणीच्या माथ्यावर उतारावर अडकून पडलो आहे, आम्हाला काही सुचत नाही आणि आम्ही दोघेही खाली पडू शकतो असे सांगितले. त्यामुळे आम्हाला तत्काळ मदत करा. 

हा कॉल जाताच पंचवटी अग्निशमन केंद्राचे स्टाफ लीडिंग फायरमन संजय कानडे, फायरमन बाळासाहेब लहांगे, वाहन चालक प्रकाश मोहिते, ट्रेनी फायरमन प्रणय बनकर, ऋषिकेश जाधव, सिद्धांत गोतीस घटनास्थळी बंब क्रमांक MH 15 HH 3309 सोबत पोहचले.

घटनास्थळी पोहोचल्यावर बंबावरील स्टाफने रेस्क्यूचे साहित्य, दोर घेऊन चामरलेणीच्या पायऱ्यांनी व कच्च्या रस्त्याने डोंगराची चढाई केली. डोंगरावरील तीव्र उतारावर अडकलेली दोन मुले दिसली.

परंतु त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी खालून रस्ता नव्हता दुसऱ्या रस्त्याने डोंगराच्या माथ्यावर जाऊन, मोठा दोर डोंगराच्या मोठ्या खडकाला बांधून अडकलेल्या युवकांकडे फेकला व प्रथम एकाला नंतर दुसऱ्या युवकाला दोराच्या सहाय्याने सुखरूपपणे वर काढून रेस्क्यू केले.

त्या युवकांना चामरलेणीवर असलेल्या पोलिस बिनतारी संदेश केंद्राजवळ बसवून पाणी पाजून धीर दिला. नंतर त्यांना डोंगराच्या कच्च्या रस्त्याने खाली पोलिस चौकी पर्यंत आणून पोलिस चौकी मध्ये त्यांच्या नावांची नोंद अंमलदार गणेश नागरे यांनी करुन घेतली.

त्यानंतर त्या युवकांना म्हसरूळ पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार नितिन पारधे यांच्या ताब्यात दिले. सोबत मदतीला वैनतेय संस्थेचे परदेशी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगावकर उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group