
सिन्नर (विजय बोराडे) - शहर आणि लगतच्या परिसरामध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या ठिकाणी बसस्थानकाचा स्लॅब देखील कोसळल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
रविवारपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली रोहिणी नक्षत्राचं वाहन हे म्हैस आहे आणि पावसाला जिल्ह्यामध्ये सुरुवात देखील झाली. इतके दिवस बेमोसमी पाऊस सुरू होता. आज दुपारी सिन्नर शहर आणि लगतच्या परिसरात पावसाने चांगला दणका दिला. सुमारे दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शहरातील विजयनगर शिवाजीनगर व इतर परिसरामध्ये पाणी साचले.
घरामध्ये पाणी शिरले, दुकानात पाणी साचले, त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. दोन तासाच्या पावसामुळे हायटेक सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब देखील कोसळला. त्यावेळी त्या ठिकाणी शिवशाही गाडी उभी होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यानंतर तातडीने हे बस स्टॅन्ड रिकामे करण्यात आले. सावधानता म्हणून नागरिकांना देखील बस स्टँडच्या बाहेर काढण्यात आले.
या दोन तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे संपूर्ण सिन्नर जलमय झाले. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. यातच वीज पुरवठा देखील खंडित झाला रस्त्यात पाणी साचल्यामुळे संपूर्ण सिन्नर शहरातील वाहतूक व्यवस्था देखील कोलमडली आहे.