8 लाख फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा आयडी न दिल्याने मुलाच्या खुनाचा प्रयत्न
8 लाख फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा आयडी न दिल्याने मुलाच्या खुनाचा प्रयत्न
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-इन्स्टाग्राम आयडी देत नाही म्हणून तिघांनी एका मुलाच्या मानेला चॉपर लावून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करीत असतानाच हे लक्षात आल्याने भद्रकाली पोलिसांच्या त्रिकोणी गार्डनच्या दोघा बीट मार्शलने धाव घेऊन पीडित मुलाची सुटका केली.

या प्रकरणी आरोपी फरीद मन्सुरी यास अटक करण्यात आली असून, त्याच्याबरोबर दोन विधिसंघर्षित बालकांनाही पोलिसांंनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी, की भद्रकाली पोलीस ठाण्यांतर्गत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल कॉन्स्टेबल संतोष आव्हाड व अझरुद्दीन इनामदार हे दि. 30 मे रोजी गस्त घालत असता कन्नमवार पुलाखाली पाच मुलांचा आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे धाव घेताच एका मुलाने दुसर्‍या मुलाच्या मानेला चॉपर लावल्याचे दिसल्याने बीट मार्शल्सनी तातडीने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपींना पळून जाण्याची संधी न देता चॉपरसह तिघांना ताब्यात घेतले व संभाव्य खुनाच्या गुन्ह्याला प्रतिबंध करून दोन पीडित मुलांची सुटका केली.

या सर्वांना गुन्हे शोध पथकाच्या मदतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात आणले असता पीडित मुलगा सौरभ सुनील मौर्या (वय 17, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) व त्याच्यासोबत असलेला साहिल शेख (रा. नानावली) यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ मौर्या याच्या इन्स्टाग्राम आयडीवर आठ लाख फॉलोअर्स आहेत.

मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असल्यामुळे व तो इन्स्टाग्राम आयडी देत नसल्याने आरोपी फरीद मन्सुरी (वय 19) व त्याच्या दोघा विधिसंघर्षित साथीदारांनी सौरभ मौर्या यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चॉपर ठेवून त्याला मारहाण केली.

या प्रकरणी आरोपीसह दोघा विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 109, 118 (1), 352, 351 (2) (3), तसेच 3 (5) यास महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे स. पो. नि. सत्यवान पवार व सहकारी करीत आहेत.

पीडित मुलांना वेळीच मदत केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-1 चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आदींनी त्रिकोणी गार्डन बीट मार्शलचे कॉन्स्टेबल संतोष आव्हाड, अझरुद्दीन इनामदार, तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक दीपक तोंडे, हवालदार संदीप शेळके, नरेंद्र जाधव, लक्ष्मण ठेपणे, कॉन्स्टेबल जावेद शेख व नारायण गवळी यांचे अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group