कळवण (भ्रमर वार्ताहर) :- तालुक्यात 181 बोगस शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कळवण भागाचा दौरा करून या ठिकाणी काही नागरिकांनी या ठिकाणी बोगस शेतकरी असल्याचे भासवून शासनाच्या पंतप्रधान किसान विमा योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कृषी अधिकारी, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे.
याबाबत कळवणच्या तालुका कृषी अधिकारी मिलन म्हस्के यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये पंतप्रधान किसान विमा योजनेचा सुमारे 181 बोगस शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शासनाची 2 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जे आरोपी आहेत, त्यांनी प्रथमदर्शनी शेतकरी नसल्याचे समोर आले आहे. या बोगस लाभार्थींनी नावांचे रजिस्ट्रेशन करून मौजे भादवण येथील शेतकरी नसताना तेथीलच रहिवासी असल्याचे भासवून स्वत:च्या बँक खात्यांवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर लॉगइन करून ही खोटी माहिती भरली व त्याआधारे शासनाची फसवणूक केली.
त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर हे अधिक तपास करीत आहेत.