चालत्या रेल्वेत महिला झाली प्रसूत ; कन्यारत्नला दिला जन्म...
चालत्या रेल्वेत महिला झाली प्रसूत ; कन्यारत्नला दिला जन्म...
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये आज  सकाळी एक महिला प्रसूत झाली. या महिलेस कन्या रत्न प्राप्त झाले असून लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल व बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत बाळ-बाळांतिणीस उपचारार्थ दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे. 

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मध्य प्रदेशातील महाराजगंज (छत्रपूर) येथील मंगल कोंडाम हे पत्नी रत्ना (वय २६) सह महानगरी एक्सप्रेसने मुंबई कडे जात होते. रेशमा या गर्भवती असल्याने त्यांना भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर प्रसूती कळा होऊ लागला.सह महिला प्रवाशांनी महिलेला धीर देत काही प्रवाशांनी फोन द्वारे रेल्वे विभागाला कळवले. माहिती प्राप्त होताच भुसावळ नियंत्रण कक्षाने याबाबत नाशिकरोड रेल्वे स्थानक व लोहमार्ग पोलिसांना  कळवले.

त्यानुसार, बिटको रुग्णालयाच्या डॉ. निलम तोरसकर, डॉ. तनुजा बागूल, डॉ. आदिनाथ सुडके लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनवणे, हवालदार श्रीमती शिरसाठ, आरपीएफचे निरीक्षक हरफूल सिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी एफ चे जवान राज यादव, मनिष सिंग हे रेल्वे स्थानकावर सज्ज होते.

महानगरी एक्सप्रेस सकाळी ७.१५ वाजता प्लॅटफार्म क्रमांकावर आली असता वैद्यकीय पथक तसेच रेल्वे पोलिसांनी जनरल डब्याकडे धाव घेऊन कोंडाम दाम्पत्याला उतरवून घेतले. या महिलेने मुलीला जन्म दिला असून त्यांना उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांसह,वैद्यकीय पथकाचे कौतूक....

पुणे येथील एका नामांकित धर्मार्थ रुग्णालयात गर्भवती महिलेस पैशांअभावी दाखल करून न घेतल्याने तिचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र जन्मतःच या मुलींना मातृसुखाला गमवावे लागले. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस तसेच बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने एका प्रवासी महिलेसाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे रेल्वे प्रवाशांनी कौतूक केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group