
५ एप्रिल २०२५
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- वैभव देवरे, तसेच कुंडलवाल पितापुत्रांच्या जीवघेण्या अवैध सावकारीचे प्रताप समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत.
सर्वसामान्य कुटुंबीयांना वेठीस धरणार्या अवैध सावकारीविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला असून, काही सावकारांच्या घराची झाडाझडतीही घेतली आहे. त्यामुळे पुढील काळात अवैध सावकारीला वेसण घातली जाईल, अशी अपेक्षा नाशिककरांमधून व्यक्त होत आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विविध दहा पथके तयार करून कारवाई सुरू केली असून, सहकार विभागाचीही मदत घेतली जात आहे.
पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले, की शहर परिसरात अवैध सावकारीने डोके वर काढले असून, सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारूनही त्यांची लूटमार करणार्या सावकारांचा जाच वाढला आहे. या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.
यापूर्वी शहरामध्ये वैभव देवरे व कुंडलवाल पितापुत्रांवर कारवाई केल्यानंतर आता इतर खासगी सावकारांविरुद्ध तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी दहा पोलीस पथके तयार करण्यात आली असून, त्यात पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून सहकार विभागाची मदत घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, आज सकाळी 14 खासगी सावकारांच्या घरांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जण पसार झाले, तर काही सावकारांच्या घरांची झडती घेतली असता तेथे काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली.
Copyright ©2025 Bhramar