म्हसरूळला अनैतिक संबंधातून युवकाचा खून; आधी केले होते अपहरण आणि मग...
म्हसरूळला अनैतिक संबंधातून युवकाचा खून; आधी केले होते अपहरण आणि मग...
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून युवकाचे अपहरण करत त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

म्हसरूळ पोलिसांनी एका महिलेसह चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांना काल न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या युवकाला मारहाण करून पेठ शिवारातील करंजाळी जवळील सावळ घाटात फेकल्याची माहिती दिली.

या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शोध कार्य सुरु करत दुपारी मृतदेह शोधून काढला. संशयितांनी या युवकाचा गळा आवळून खून केला होता. 

श्रीकांत भीमराव उबाळे (वय २२, रा. वज्रेश्वरी झोपडपट्टी, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक) या युवकाचे म्हसरूळ येथील कलानगर परिसरातील एका महिलेशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

या प्रेमसंबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागली होती. याबाबत त्याने पाळत ठेवत त्यांना नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. यामुळे संतप्त पतीने आपल्या मित्रांच्या मदतीने दि. १० मार्च रोजी कलानगर परिसरात रिक्षातून त्याचे अपहरण करीत त्याला पेठरोडच्या दिशेने घेऊन जात करंजाळी परिसरात त्याला मारहाण केली.

म्हसरूळ पोलिसांनी संशयित दीपक कुंडलिक काकडे, (वय २६, रा. कलानगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड, पंचवटी), सविता कुंडलिक काकडे, (वय ४५), चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय ५२), आणि राहुल अशोक शेळके, (वय ३०, रा. गोदाघाट, पंचवटी) यांना ताब्यात घेत अटक केली होती. या संशयितांना काल न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. 

संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी श्रीकांत उबाळेचे अपहरण करून त्याचा गळा आवळून त्याचा मृतदेह पेठ शिवारातील करंजाळी जवळील सावळघाटात फेकल्याचे सांगितले. संशयितांना घेऊन आज सकाळी म्हसरूळ पोलिसांचे पथक, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक, होमगार्डसह घटनास्थळी पोहचले.

यावेळी ग्रामीण पोलिसांचे पथक देखील मदतीसाठी सावळघाट परिसरात दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घाटात श्रीकांत उबाळे याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते. सकाळपासून शोधकार्य सुरु केल्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने दुपारी तीन वाजेच्या दरम्यान श्रीकांतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.

पोलिस पथक आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group