नाशिक : संत कबीर नगरमध्ये भर रस्त्यात एका युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना काल रात्री घडली.

अरुण राम बंडी (रा. कामगार नगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अरुण काल रात्री संत कबीर नगर मध्ये आला असता सातपूरच्याच एका टोळक्याने त्याला तिथे एकटे गाठले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाले. वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. टोळक्याने दगड, विटा, हॉकी स्टिक व धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला. रक्त मोठ्या प्रमाणात गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समजते.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. गंगापूर पोलिसांनी रात्री या भागात शोध घेऊन 3 हल्लेखोर ताब्यात घेतले असून, त्यात एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. इतर फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. अरुणचे या भागात राहणाऱ्या काही युवकांसोबत जुने वाद होते.
सातपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी अरुणवर एक गुन्हा दाखल आहे. घटनेची माहिती मिळताच दंगा पथक तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.