पापड, लोणचीसह वाळवणच्या पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास महिला स्वयंपूर्ण बनतील : चंदुलाल शाह
पापड, लोणचीसह वाळवणच्या पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास महिला स्वयंपूर्ण बनतील : चंदुलाल शाह
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पूर्वीच्या काळी ग्रामीण भागा प्रमाणेच शहरात देखील अनेक कॉलनी, वसाहती किंवा वाडयांमध्ये महिला एकत्र येऊन वाळवणाचे पदार्थ तयार करीत असत. मात्र अलीकडच्या काळात मॉल संस्कृती वाढल्याने मॉलमधून रेडिमेडरित्या पापड, लोणची सारखे पदार्थ विकत घेण्याची प्रथा सुरू झाली आहे.

वास्तविक पाहता हे पदार्थ ग्रामीण भागातील महिलांकडूनच विकत घेऊन मॉलमध्ये ठेवले जातात आणि त्यांना जादा पैसे आकारावे लागतात. याउलट महिलांनी एकत्र येऊन पापड, लोणची सह वाळवणाचे पदार्थ तयार करून बाजारपेठेत विकल्यास महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होऊन त्या स्वयंपूर्ण होतील, असे मत दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांनी व्यक्त केले.

महिलांनी महिलांकडून महिलांसाठी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री अंगणमेवा अर्थात वाळवण जत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्र्यंबक रोड नजीक असलेल्या सिबल हॉटेल समोर पीएनटी कॉलनीमधील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात दोन दिवसीय वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उद्घाटन चंदुलाल शाह यांच्या हस्ते आज झाले. यावेळी व्यासपीठावर सिनेनाट्य अभिनेते किरण भालेराव, प्रवीण कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अजित सारंग, दूरदर्शनच्या सेवानिवृत्त निवेदिका स्नेहल सारंग, डॉ. मंजुषा दराडे, डॉ. ज्योती सोनवणे, सुहास भणगे आदी उपस्थित होते.    
 
यावेळी चंदुलाल शाह म्हणाले की, म्हणाले की पूर्वीच्या काळी वाडा संस्कृती होती, त्यामुळे अनेक सण समारंभामध्ये पुरुष मंडळी एकत्रित तसेच महिला देखील वेगवेगळे सण समारंभ एकत्र साजरे करत असत. त्याचप्रमाणे वाळवणचे पदार्थ देखील एकत्रितपणे करण्यात येत असत. त्यामुळे सहकार्याच्या भावनेतून ही कष्टाची कामे देखील सहजरीत्या पार पाडली जात असत. अलीकडच्या काळात मात्र महिल नोकरी करू लागल्याने कोणतेही पदार्थ मॉलमधून रेडिमेड आणण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र महिलांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या पापड, कुरडई, शेवया, शेव- चिवडा - फरसाण, मिठाई सह अन्य खाद्य पदार्थ तसेच ज्वेलरी व कलाकुसरीच्या वस्तू त्याचप्रमाणे कलात्मक पेंटिंग्स बनवून विकल्यास तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यास निश्चितच त्याचा सर्वांना फायदा होईल. आपण देखील या वस्तू विकत घेण्याची आणि वापरण्याची सवय लावली पाहिजे.

नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात अशाप्रकारे बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. कारण घरगुती पदार्थांचा दर्जा उत्तम असतो त्यामध्ये प्रेमाने जीव ओतून प्रामाणिकपणे काम केलेले असते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी किरण भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजक स्नेहल सारंग यांनी या उपक्रमाची माहिती सांगितली. संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा वारली पेंटिंग फ्रेम आणि बेदाणे पाकीट देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रवीण कुलकर्णी यांनी मानले .

दरम्यान, दोन दिवसीय या प्रदर्शनात विविध बचत गटाच्या महिलांनी पापड, कुरडई, शेवया, लोणची, चिप्स, लेडीज ज्वेलरी, बांगड्या, लेडीज ड्रेस, काजू - बदाम सह सुकामेवा, चॉकलेट, वारली पेंटिंग आदींसह विविध पदार्थ व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे आयोजक स्नेहल सारंग यांनी सांगितले. 
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group