
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- मित्रासोबत किरकोळ वादातून तणावग्रस्त झालेल्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप उगले यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १४ मार्च रोजी रात्री ०८:२० वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक युवक मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. गस्त घालणारे पो. हवा. संदीप उगले यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे ट्रॅकवर उडी मारली आणि त्या युवकाला त्वरित बाजूला ओढून सुरक्षित केले.
वाचवण्यात आलेल्या युवकाचे नाव अभिषेक अशोक काचकुंडे (रा. अंबड, नाशिक) असे असून, त्याने मित्रासोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे मानसिक तणावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला समजावून सांगत मानसिक धैर्य दिले आणि त्याचे मूळ गावी जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसमध्ये बसवले.
या संपूर्ण कामगिरीचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. संदीप उगले यांनी उत्कृष्टरीत्या पालन केले. रेल्वे पोलिसांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे एक अनमोल जीव वाचला, यामुळे लोहमार्ग पोलीस संदीप उगले यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.