
नाशिक जिल्हा क्रिकेट साठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १९ वर्षांखालील युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या एलिट कॅम्प साठी निवड झाली आहे.
माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरूच्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत २ ते २८ एप्रिल दरम्यान हे शिबीर होणार आहे. भारतभर विविध ठिकाणी सदर शिबिर होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकूण सहा खेळाडूंची यासाठी निवड झाली आहे.
पुदुचेरी येथे होणाऱ्या एलिट कॅम्प साठी टीम सी मध्ये साहिल पारखसह महाराष्ट्राच्या योगेश चव्हाणची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे शुभम कदम, साहिल नलगे, नीरज जोशी व सुश्रुत सावंत हे खेळाडू इतर ठिकाणी शिबिरात सहभागी होतील.
नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकावलेल्या साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती .
या पूर्वी देखील सलग दोन हंगामात युवा खेळाडूंसाठी बीसीसीआयच्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे झालेल्या शिबीरात साहिलची सलग दोन वेळा निवड झाली होती. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता साहिलची एन सी ए च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी तिसऱ्यांदा निवड झाली आहे.
२०२३-२४ च्या हंगामात इंदोर येथे झालेल्या बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. बी सी सी आय च्या त्या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती .
साहिलच्या या अतिशय महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.