नाशिक : 4 लाख रुपयांची लाच मागून तडजोडी अंती साडे तीन लाख रुपयांची लाच घेताना निफाडच्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
नितेंद्र काशिनाथ गाढे (वय 35) असे लाच घेणाऱ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख निफाड कार्यालयातील शिपायाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षि, तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दि. 25. 11.2025 रोजी अर्ज केला होता.
तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय इथून दिनांक 28.2.2018 रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या.
गाढे यांनी भाबड, उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दि. 7.3.2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दि. 6.3.2025 रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे 400000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 350000 रुपये लाचेची मागणी करून ही लाचेची रक्कम आज घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी केली.