
६ मार्च २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खा. संजय राऊत यांच्या दौर्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती सुरु झाली. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले. आजूनही ही गळती कायम आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळती रोखण्यासाठी संजय राऊत यांनी नाशिकची चक्रे फिरवली आहेत. काही दिवसांपूर्वीच ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी त्याचवेळी फेरबदलाचे संकेत दिले होते.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव केला. ठाकरे सेनेच्या या विजयात बडगुजर यांचा मोठा वाटा आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे.
Copyright ©2025 Bhramar