"त्या" जीबीएस संशयित रुग्णाबाबत जिल्हा रुग्णालयाने केला "हा" खुलासा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.

त्यामुळे सध्या तरी तो मुलगा जीबीएस (गुलेन बारी सिंड्रोम) रुग्ण असल्याची पुष्टी देणे सद्य:स्थितीत योग्य होणार नाही. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली.

इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत एका मुलास कांजण्यासदृश आजार उद्भवल्यामुळे मुंढेगाव आश्रमशाळेतून घरी पाठविण्यात आले होते; मात्र या मुलास उठण्यास त्रास जाणवत असल्याने हा मुलगा जीबीएसबाधित आहे काय, याचे शंकानिरसन करण्यासाठी प्रथम खासगी विशेषज्ञाकडे तपासणी केली होती. त्या डॉक्टरने जीबीएस संशयित म्हणून या मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते.

त्याच्या रूपाने नाशिक जिल्ह्यात जीबीएस या रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय, या शंकेतून जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत होती; मात्र या मुलाची प्रकृती स्थिर असून, या मुलाचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने तो जीबीएसबाधित असल्याची पुष्टी देणे सद्य:स्थितीत योग्य होणार नाही, असे डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच मुंढेगाव आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व पाणी नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यावेळी अन्य कोणत्याही विद्यार्थ्याला जीबीएसची लक्षणे आढळलेली नाहीत.

दरम्यान, राज्य शासनाने सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जीबीएसची प्राथमिक तपासणी सुरू केली असून, तशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group