विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवून महायुती पुन्हा एकदा सत्तेत परत आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, एकीकडे मंत्रिपदाचा घोळ अद्यापही कायम असताना दुसरीकडे फडणवीसांनी प्रशासकीय विभागातील बदलांचा धडाकाच लावला आहे. रामेश्वर नाईक यांची वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंचे खास असलेल्या मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावरुन हटवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम किती प्रभावीपणे होऊ शकते आणि त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी किती फायदा होऊ शकतो, याची पहिल्यांदा प्रचिती आली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पदावर काम करताना मंगेश चिवटे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा कारभार डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे आला आहे.