राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
शपथविधी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. तथापी, यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहिन योजनेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेचा विस्तार केला जाईल, पात्र महिलांना 2,100 रुपये दिले जातील. अर्थसंकल्पाच्या नियोजनादरम्यान तपशीलांवर चर्चा केली जाईल. राज्याच्या आर्थिक स्त्रोतांचे मूल्यांकन केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. 2,100 रुपयांचे आश्वासन पूर्ण केले जाईल, तसेच योजनेतील लाभार्थ्यांना त्यांची देणी मिळावीत यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असं आश्वासनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या उपक्रमाबद्दल भाष्य केलं. राज्यातील लाडक्या बहिणींना 1 जानेवारी पासून 2100 रुपये देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करावे. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिन्याला 3 हजार रुपये देणार होतो, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.