विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळून 50 जागाच जिंकता आल्या. त्यानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रालयामध्ये लगेचच मंत्रिमंडळाची बैठकीचं देखील पार पडली. दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वृत्त वाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुढीच पाच वर्ष हे सरकार महाराष्ट्रासाठी कशापद्धतीनं काम करणार याबाबत आपली भूमिका मांडली. सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
ईव्हीएमवर मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा आत्मचिंतन केलं पाहिजे. झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली. महाराष्ट्रात ईव्हीएम चांगली नाही. लातूरला धीरज देशमुख हरतात ईव्हीएम चांगली नाही. तर अमित देशमुख जिंकल्यावर ईव्हीएम चांगली आहे. त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर त्यांना चांगल्या जागा मिळतील, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.