राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, महायुती सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे दिली जाणार आणि कोणते खाते कोणाला मिळणार, याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे. .
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १३ डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत. कालच्या बैठकीत १३ तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा झाली. या चर्चेत १३ डिसेंबर या तारेखेवर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मंत्रिमंडळात कोण-कोण असणार यावर देखील चर्चा तसेच निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहे.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सत्तावाटपाबाबत एक फॉर्म्युला पुढे आला होता, ज्यामध्ये पाच आमदारांमागे एक मंत्रीपद असेल, असे सांगण्यात आले होते. भाजपकडे एकूण १३२ आमदार आहेत, त्यामुळे त्यांना २२ ते २३ मंत्री मिळू शकतात. तसेच ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला ११ ते १२ आणि ४१ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला ८ ते १२ मंत्रीपदे मिळू शकतात.