हत्येचा थरार !  गुंड समजून इंजिनिअर तरुणाची चाकुने वार करून हत्या
हत्येचा थरार ! गुंड समजून इंजिनिअर तरुणाची चाकुने वार करून हत्या
img
दैनिक भ्रमर
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. दरम्यान अशीच हत्येच्या थराराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आले. एका सॉफ्टवेअर अभियंता तरुणाची गुंड समजून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री हा इंजिनियर तरुण जेवण करण्यासाठी जालना रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेला होता.

यावेळी हॉटेलमध्ये काही तरुण हॉटेलच्या मालकाशी वाद घालत होते. नेमकं याच वेळी अभियंता तरुण हॉटेलमध्ये गेल्यानं वाद घालणाऱ्या टोळक्याने हॉटेल मालकाने बोलावला गुंड समजून या सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार केले. काही कळायच्या आत हा हल्ला झाल्याने इंजिनिअर तरुणाला आपला जीव वाचवता आला नाही. या दुर्दैवी घटनेत इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक  घटना घडली आहे. हा सगळा प्रकार शुक्रवारी रात्री ३ च्या सुमारास घडला. या प्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजू पेड्डी असं हत्या झालेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील राम ज्योती नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. पण घटनेच्या दिवशी लग्नानिमित्त घरातील सर्वजण हैदराबादला गेले होते. तर मयत तरुणाचं वर्क फ्रॉम होम असल्याने तो  आपल्या घरी काम करत होता. रात्री उशिरा काम संपल्यानंतर संतोष जेवण करण्यासाठी जालना रस्त्यावरील झाल्टा फाटा इथं आला. इथल्या यशंवत हॉटेलमध्ये तो जेवणासाठी गेला असता यावेळी काही तरुण हॉटेल मालकाशी वाद घालत होते.

घटनाक्रमानुसार , हे टोळकं हॉटेल मालकाला दमदाटी करून जेवण करत होतं. यावेळी त्यांनी स्वत:च्या हाताने फ्रीजमधील काही शीतपेयं देखील घेतली होती. पण ज्यावेळी जेवणाचं बिल आलं, तेव्हा या टोळक्यानं हॉटेल मालकाला दमदाटी करायला सुरुवात केली. जेवणाच्या बिलावरून वाद सुरू असताना, मयत संतोष आपल्या फॉर्च्युनर कारने हॉटेलमध्ये आला. संतोषची धिप्पाड शरीरयष्टी पाहून तो हॉटेल मालकाने बोलावलेला गुंड असावा, असा समज आरोपी टोळक्याचा झाला. यानंतर क्षणाचाही विलंब न करता आरोपींनी संतोषवर चाकुने वार केले. या हल्ल्यात संतोष रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.

दरम्यान, यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनी संतोषला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. छातीवर झालेला वार वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन संतोषचा मृत्यू झाला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group