आज सायंकाळी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. या निर्णयातून रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात असेही ते म्हणाले
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या