नाशिक :- थ्री एचपी सोलर बसविण्यासाठी सर्व्हे करून रिपोर्ट सादर करण्यासंदर्भात महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने लाच म्हणून एक हजार रुपये स्वीकारल्याची घटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीमध्ये उघड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या त्र्यंबकेश्वर येथील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ठाणापाडा स्टेशनमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण जगन्नाथ सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांनी पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत थ्री हॉर्स पॉवरचे सोलर बसवून सर्व्हे करून महावितरणाच्या मोबाईल ॲप वर रिपोर्ट सादर करावा यासाठी अर्ज केला होता.
या अर्जानुसार तो रिपोर्ट सादर करण्यासाठी सूर्यवंशी यांनी प्रथम 1500 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 1000 रुपये घेण्यास ते तयार झाले. ही रक्कम पंचांसमोर स्वीकारताना सूर्यवंशी यांना आज अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.