बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. त्यानंतर आता बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
दरम्यान , आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षकांनी पीएसआय राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पीआय प्राशांत महाजन यांच्या निलंबनासाठी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच विशेष सरकारी वकिलांची मागणीदेखील मान्य करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी 2 पथके रवाना झाल्याची माहितीदेखील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.