शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा ‘महा’शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता.
खरं तर शपथविधीला एक तास बाकी असताना देखील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा आग्रह आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्या शिष्टाईंनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाले. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी जरी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी खाते वाटपावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शपथविधीसोहळ्यानंतर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.