आज सायंकाळी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आता मंत्रालयातील हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथा परंपरेप्रमाणे मंत्रालय वार्ताहर संघात पत्रकार परिषद घेतली. आगामी काळातील प्रमुख आव्हाने, महत्त्वाकांक्षी प्रकल्प, राजकीय तसेच आरक्षणासारखा सामाजिक प्रश्न, रोजगारविषयक संधी तसेच विरोधी पक्षनेतेपदाबाबत नव्या सरकारची भूमिका अशा विविध विषयांवर फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईत होणाऱ्या अधिवेशनातच होईल तसेच नागपूरच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस यांना विचारले असता, विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू. नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षांची निवड करावी लागते आणि त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होते. आत्ताच मंत्रिमंडळाची शिफारस आम्ही राज्यपालांना पाठवली आहे. सात, आठ तारखेला नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ होतील आणि नऊ तारखेला अध्यक्षांची निवड होऊन राज्यपालांनी अभिभाषण करावे, असे आम्ही सुचवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमची जवळपास प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. माझा स्वत:चा अंदाज असा आहे की आम्ही नागपूर अधिवेशनाच्या आधी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.