नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- किराणा दुकानदाराशी जबरदस्तीने अंगलटपणा करून त्याला बदनामीची भीती घालून त्याच्याकडून साडेसात लाख रुपये घेऊन दरमहा दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्या महिलेसह एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिल सुकलाल सिनकर (रा. संजीवनगर, अंबड) यांचे किराणा दुकान आहे. दि. 22 ऑगस्ट ते 22 डिसेंबर 2024 यादरम्यानच्या कालावधीत पाथर्डी फाट्याजवळील ज्ञानेश्वरनगर येथे आरोपी अनंत (पूर्ण नाव माहीत नाही), सोनाली ऊर्फ सुवर्णा सुभाष चव्हाण (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) यांनी आपसात संगनमत केले.
सोनाली चव्हाण हिने फिर्यादी सिनकर हिच्याशी जबरदस्तीने अंगलटपणा करून त्याबाबत बदनामीची भीती घालून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच फिर्यादीचे आरोपी सोनाली चव्हाण हिचे अनैतिक संबंध असल्याबाबत बळजबरीने त्याच्या तोंडून वदवून घेत त्याचा व्हिडिओ तयार केला.
तसेच, हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच हा व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल, तर सिनकर यांच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली, तसेच 7 लाख 53 हजार 500 रुपयांची रक्कम जबरदस्तीने फोन पे, तसेच पूजा टेक्स्टाईल, अंबड गाव बस स्टॉप, तसेच चव्हाण हिच्या राहत्या घरी देण्यास भाग पाडले. एवढेच नाही, तर पुढील दहा महिन्यांसाठी दरमहा दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या त्रासाला कंटाळून अखेर अनिल सिनकर यांनी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी अनंत व सोनाली ऊर्फ सुवर्णा चव्हाण यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांडे करीत आहेत.