काल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून नागपुरात भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला . शपथविधी सोहळ्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एका मुंबईकर आमदाराला मोठ्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपदामुळे बीसीसीआय खजिनदारपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शेलारांना बीसीसीआयच्या ऑफीस ऑफ प्रॉफीट नियमानुसार हे पद सोडावं लागणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयच्या खजिनदारपदी कुणाची नियुक्ती होणार? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.