महायुती सरकरमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ते मंत्रिमंडळाचा विस्तार यामध्ये नेत्यांचे नाराजीचे सुरु पाहायला मिळाले. दरम्यान पुन्हा एका मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावरूनही नाराजीसत्र सुरूच आहे. अजित पवार सुद्धा नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मागील २४ तासांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुठेच दिसले नाही. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले. परंतु आता अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाच्या कामानिमित्त अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले दोन दिवस हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित आहेत. वक्तशीर, शिस्तप्रिय असे अजित पवार यापूर्वी कधीही मोठ्या कारणाशिवाय सभागृहात अनुपस्थित राहत नाहीत. मात्र यावेळी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण हे त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे. छगन भुजबळ यांनी पुकारलेलं बंड अजित पवार यांना डोईजड होत आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.