राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाकडे लागले आहे . याच दरम्यान आता राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर अनेक चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप समोर आलेलं नाही.
मात्र, या भेटीवर आता अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळेक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सूचक विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा असं बोलणारे आता दादा मला वाचवा असं बोलत आहेत. भविष्यात जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध झाला तर प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी असणार आहे.
तसेच, सुनंदा पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.कोणत्याही पक्षाचा आधारस्तंभ हा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो. दोन्ही गटानं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला देखील तसंच वाटतं अजितदादा यांची भेट झाल्यानंतर त्यांना मी शुभेच्छा देखील नक्की देणार आहे, असं सुनंदा पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात काहीही घडू शकतं असं त्यांनी म्हटलं होतं.