राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र सध्या चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची होत आहे.
दोघांमध्ये दिल्लीत बैठक झाली. सोबत सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. अजित पवार सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. दरम्यान बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? यावर उत्तर देत, 'मी बाहेरचा कुठे घरचाच आहे. राजकारणाच्या पलीकडेही काही संबंध असतात. असं अजित पवार म्हणाले.
पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेले. ते सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीला गेले. भेट घेत त्यांनी शुभेच्छाही दिल्या. मात्र बंद दाराआड राजकीय चर्चा झाली का? यावर प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, 'आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो. परभणीमध्ये नेमकं घडलं, यासह इतर गोष्टींवर आमची चर्चा झाली.
पुढे अजित पवार म्हणतात, 'आमच्यात जनरल चर्चा झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? अधिवेशन कधी होणार आहे? अधिवेशनाच्या इतर कामकाज, नेहमीच्या गोष्टींवर आमची चर्चा झाली.' तसेच त्यांनी राजकीय प्रश्नांवर उत्तर देणं टाळलं. 'आज १२ डिसेंबर आहे. आज शरद पवार यांचा वाढदिवस असतो. त्यांना भेटून फक्त शुभेच्या दिल्या' असं ते म्हणाले.
मी घरातलाच आहे, बाहेरचा कुठे?
'मी घरातलाच आहे, मी बाहेरचा कुठे. राजकारणात एकमेकांवर टीका होत असतात. पण त्याव्यतिरिक्त कौटुंबिकही संबंध असतात. यशवंतराव चव्हाण यांनी संस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसं करावं हे शिकवलं आहे. त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे.' असं ते म्हणाले. नंतर अमित शहा यांना भेटायला जाणार असंही अजित पवार म्हणाले.