मुंबई: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रीमंडळाचा तिढा अजून सुटला नाहीये. तिन्ही पक्षांत मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. यात एकनाथ शिंदे गटाची कोंडी होताना दिसत आहे. गृहखातं न मिळाल्याने एकनाथ शिंदे आधीच नाराज असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्या हातून महसूल खातं देखील जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशी एकूण स्थिती असताना शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.
अशातच आज मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबतचा उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल विरोधात गेला तर शिंदे गटाचा एक खासदार कमी होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालात गोंधळ बघायला मिळाला होता. सुरुवातीला अमोल किर्तीकर यांचा १ मतांनी विजय झाल्याची बातमी समोर आली होती. पण त्यानंतर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ४८ मतांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा पराभव केल्याचं सांगण्यात आलं. यानंतर किर्तीकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी रवींद्र वायकर यांच्या निकालाला आव्हान दिलं होतं. मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप करत किर्तीकरांनी रवींद्र वायकरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.
आता या याचिकेवरील युक्तीवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. गुरुवारी (१२ डिसेंबर) याबाबतचा निकाल न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो. यामुळे शिंदे गटासह रवींद्र वायकर यांची धाकधूक वाढली आहे. न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.