राज्यात महायुती स्थापन झाले असून राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदराची आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहोत. त्यामुळे सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपली प्रथा आहे. या प्रथेनुसार अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच “कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असेल की सर्वपक्षीय नेत्यांची जाण्याची आपल्या राज्याची एक चांगली परंपरा आहे”, अशीदेखील प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
एकनाथ खडसे यांनी परभणीतील घटनेवरही प्रतिक्रिया दिली. “संविधानाचा अपमान कोणी करत असेल तर भावना दुखावणे स्वभाविक आहे. पण यातून हिंसाचार करणे, बसेस जाळणे, या घटना काही संयुक्त नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी एकनाथ खडसे यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.