महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. नागपुरातील राजभवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा समावेश आहे.
यानंतर आता खातेवाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आहे. यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. परंतु, भाजप गृह विभाग सोडण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला अन्य विभाग मिळू शकतात.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते. त्यामुळे आताही नगरविकास खाते शिवसेनेला दिले जाण्याची शक्यता आहे.
गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन, आरोग्य, शालेय शिक्षण खाते शिवसेनेला मिळणार आहे. यातील उद्योग आणि शालेय शिक्षण ही खाती आधीही शिंदे गटाकडेच होती. सार्वजनिक बांधकाम विभाग (सा. उपक्रम वगळून), पाणीपुरवठा खातेही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जलसंधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातेही शिवसेनेला मिळणार आहेत. गृह खात्याची मागणी शिवसेनेकडून वारंवार केली जात आहे. एकनाथ शिंदे या खात्यासाठी आग्रही आहेत.
मात्र हा विभाग सोडण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता नगरविकास विभाग दिला जाणार आहे. याशिवाय अन्य काही महत्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात.